२ लाख ८० हजार पर्यटकांनी दिल्या भेटी
उद्यानाची वर्षपूर्ती; उद्यान बचाव समितीतर्फे पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
पैठण, (प्रतिनिधी):
बंद अवस्थेत पडलेले संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकासाठी खुले करण्यात यावे यासाठी उद्यान बचाव समिती तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या कडे समितीतर्फे पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून उद्यानाच्या विकासासाठी २९ कोटी रुपयांची तरतुद करून घेतली होती. पर्यटन विभाग तसेच विविध माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु या निधीचा म्हणावा तसा सदउपयोग झाला नाही.
उद्यानातील २९ कोटीची कामे दर्जाहीन करण्यात आली असून या दर्जाहीन कामा संदर्भातही तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. परंतु गुत्तेदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही संबंधित विभागाचे अधिकारी व गुत्तेदार यांनी या २९ कोटी रुपयाची विल्हेवाट लावली. २६ जानेवारी २०२५ रोजी हे संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकासाठी खुले करण्यात आले. उद्यानात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. संगीत कारंजा कडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठेही फलक लावण्यात आले नाही तसेच संगीत कारंजे कधी सुरू होते? किती शो होतात याचे सुद्धा कुठेही फलक लावण्यात आले नाही. फुटपाथवर कुठेही दिवे सुरू नाही त्यामुळे पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
जागोजागी फरश्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. ठिकठिकाणी फुटपाथवर पाणी गळत असल्याचे दिसत आहे. सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी पर्यटकासाठी उद्यान खुले करण्यास एक वर्ष पूर्ण झाले आहे. खरंतर संत ज्ञानेश्वर उद्यान हे पैठणचे वैभव आहे. ज्याप्रमाणे पैठणचा २५०० वर्ष पूर्वीचा प्राचीन इतिहास आहे तसे अनेक ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत. पैठणची प्राचीनता पवित्रता आणि इतिहास ही आपल्या पूर्वजांची देणगी आहे. परंतु गोदावरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे संत ज्ञानेश्वर उद्यान कधी बंद पडेल याची वाट पहात आहेत.
अधिकारी व गुत्तेदारांनी या उद्यानाची संपूर्णपणे वाट लावली आहे. उद्यानात लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली ६० खजुरांचे झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. तसेच बेड मध्ये हिरवळ ऐवजी जंगली टणटणी लावण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छर, किडे तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण आहे. उद्यानात सर्वत्र अंधार वास्तविकता उद्यानाच्या विकासासाठी २९ कोटी चा निधी उपलब्ध झाला होता.
त्यामधून या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आले असते तर दर महिन्याला लाखो रुपयाचा वीज बिलाचा भुर्दंड लागला नसता. विजेच्या बिलापोटी महिन्यातला एक ते दीड लाख रुपये खर्च होत आहे. हा खर्च वाचला असता. ऑनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी उद्या विकासाच्या प्रयत्नामुळे तसेच खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत ज्ञानेश्वर उद्यान हे सुरू होऊन एक वर्ष झाले आहेत परंतु गोदावरी पाटबंधारे विभागामार्फत त्याची प्रसिद्धी करण्यात आली नाही. त्यांची वेबसाईट सुरू करण्यात आली नाही त्यामुळे उद्यान सुरू आहे की नाही याची माहिती देशभरातील पर्यटकांना मिळत नाही. दरम्यान या एका वर्षात जवळपास दोन लाख ऐंशी हजार पर्यटकांनी भेटी दिल्या असून शासनाला या माध्यमातून जवळपास ८० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. एक वर्ष पूर्ती निमित्ताने उद्यान बचाव समितीतर्फे प्राध्यापक संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, रमेश शेळके, बाळू आहेर, बजरंग काळे, शिवाजी गाडे, गुरुदत्त परदेशी यांनी पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पर्यटकांसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू करण्यात आल्याने पर्यटकातर्फेही उद्यान विकास समितीचे आभार व्यक्त करण्यात आले.
भुमरे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकासाठी खुले करण्यात आले आहे दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत चालली असून हे गर्दी टाळण्यासाठी व पर्यटकांचा वेळ वाचण्यासाठी गोदावरी पाटबंधारे विभाग मार्फत ऑनलाइन तिकीट बुकिंग ची व्यवस्था करण्यात यावी क्यू आर कोड घेण्यात यावा अशी मागणी उद्यान विकास समितीतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिजिटल इंडियाचे स्वप्न पहात असताना मात्र गोदावरी पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.














